मला आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव | सौ. रेखा प्रकाश मोहरीर. | Gajanan maharaj anubhav

 अनुभव:

Gajanan maharaj anubhav


मला आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करीत आहे. लॉक डाऊन च्या काळात 12, 13 एप्रिल ला विद्याताई पडवळ यांचे युट्युब वर लाईव्ह मुखोद्गत पारायण होते. मी ते दोन्ही दिवस ऐकले. दुसऱ्या दिवशी पारायण झाल्यावर आम्ही महाराजांची आरती केली, तेव्हा मी सहज महाराजांना बोलून गेले, "महाराज, मला विठ्ठल स्वरूपात दर्शन द्या". त्याचे कारण असे होते की मी व माझे मिस्टर जुलै 2017 मध्ये पंढरपूरला गेलो होतो. आठ दिवसानंतर आषाढी एकादशी होती, त्यामुळे पंढरपूर ला खूप गर्दी होती, बारा तास दर्शनाला लागत होते, त्यामुळे आम्ही विठ्ठलाचे फक्त मुखदर्शन घेतले. पंढरपूरला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येते हे माहिती होते पण एवढ्या गर्दीत बारा तास उभे राहून दर्शन घेण्याची मनस्थिती नव्हती त्याचे फार वाईट  वाटले. म्हणून यावर्षी 28 मार्च ची आम्ही पंढरपूरची तिकिटे काढली आणि या वेळेस छान दर्शन होईल असे वाटले, पण कोरोना मुळे लॉक डाऊन असल्याने देऊळ 31 मार्चपर्यंत बंद राहणार असे सांगण्यात आले. त्यामुळे आमची तिकिटे कॅन्सल करायला लागली.  ह्यावेळी पण विठ्ठलाचे दर्शन राहून च गेले. म्हणून मी गजानन महाराजांना म्हटले की तुम्हीच आता मला विठ्ठलाचे दर्शन घडवा. ही गोष्ट 13 एप्रिल ची. नंतर 18 एप्रिल च्या सकाळी सकाळी तीन-चारच्या सुमारास मला स्वप्न पडले. शेगावला  महाराजांची गाभाऱ्यात जी मूर्ती आहे त्या मूर्तीसमोर विठ्ठलाची मूर्ती तेवढ्याच उंचीची उभी असलेली मला दिसली. विठ्ठलाच्या मागून महाराजांची मूर्ती दिसत होती. मी छान दर्शन घेतले आणि मला एकदम जाग आली. स्वप्न आठवून मला फार आनंद होत होता म्हणून माझ्या मिस्टरांना मी जागे करून स्वप्न सांगितले आणि तेव्हा महाराजांनी माझ्या लक्षात आणून दिलं की आज एकादशी आहे आणि मी तुला विठ्ठलाचे दर्शन घडवले. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. हे सांगताना अजूनही माझ्या अंगावर शहारे येत आहेत! मी धन्य धन्य झाले आणि महाराजांचे वारंवार आभार मानू लागले. महाराजांनी खरंच मला विठ्ठलाचे दर्शन घडवले. महाराजांनी विठ्ठलाच्या दर्शनाची माझी इच्छा पूर्ण केली. 

महाराजांच्या पोथीतल्या दुसऱ्या अध्यायात लिहिल्याप्रमाणे, "हे ना शेगाव राहिले | पंढरपूर खचित झाले | चालते-बोलते येथे आले | साक्षात हे पांडुरंग |

" याची मला प्रचिती आली. महाराजांची अशीच कृपादृष्टी सदैव राहो ही श्रीचरणी प्रार्थना. 🙏🏻


|| श्री गजानन जय गजानन ||

       -सौ. रेखा प्रकाश मोहरीर.

                  विलेपार्ले ( पूर्व) मुंबई

गजानन महाराज अनुभव | जयंत वानखेडे शिवाजी नगर, मेहकर.