श्री विष्णू सहस्त्रनाम श्लोक मराठी भावार्थ | श्लोक १

vishnu sahastranam marathi bhavarth
🚩⚜️🌹 विष्णुसहस्रनाम शाङ्‌कर्भाष्याधारे मराठी अर्थ 🌹⚜️🚩
           श्री_विष्णू_सहस्त्रनाम_श्लोक_भावार्थ श्लोक-१ 

🚩 महाभारतातील एक महान विभूति म्हणजे पितामह भीष्म. त्यांनी राजा युधिष्ठिराला उपदेश करतांना जी भगवत-स्तुतीपर स्तोत्र रचना केली ती म्हणजे विष्णुसहस्रनाम. 

🚩 सत्ययुगांतील मनुष्याची भोगवृत्ती, त्याचे चित्त व वृत्ती पूर्णपणें मलीन होण्या‍इतकी पराकोटीला गेलेली नव्हती. थोड्याशा प्रयत्नपूर्वक ध्यान साधनेने त्याला इष्ट गोष्टींची प्राप्ती होत होती. 

🚩 त्याकाळी चित्त-वृत्ती अतीमलीन नसल्यामुळेच ध्यानयोग बहुधा सोपा असला पाहिजे. द्वापारयुगात ध्यान योगानें लवकर सिद्धि होत नसल्यामुळें पूजा-यज्ञादि कर्मांवर विशेष भर होता. 

🚩 कलीयुगात या दोन्ही विधि अतिदुस्तरच दिसतात. सोपा आहे तो नाम-जप यज्ञ. भावपूर्ण स्तोत्राने स्तुतिगान करणे हाही त्यातलाच एक प्रकार. स्तुति स्तोत्रें कां रचली जातात ? वेद अपौरुषेय असल्यामुळें त्यांचा काळ कोणत्या युगांतील म्हणून सांगता येत नाहीं. पण वेदांत तत्त्वज्ञान ह्या व्यतिरिक्त कर्मकाण्डाचे स्थान स्पष्ट दिसते. यावरून वेद कलीयुगापूर्वी झालेले असले पाहिजेत. पण स्तुतीपर जे कांही प्राचीन वाङ्गमय दिसते त्यातील बरेचसे कलीयुगातील. 

🚩 श्रीव्यासांनीही नारदमुनींच्या सांगण्यावरून भगवत-स्तुती प्रित्यर्थ जेव्हां श्रीमद्-भागवताची रचना केली, तेव्हांच त्यांना शांती लाभली.

🚩 भगवद्-गीतेतही भगवान् म्हणतात - यज्ञानाम् जपयज्ञोऽस्मि. म्हणूनच कोणतेही स्तोत्रपठण केल्यानंतर आपले चित्त भगवद् भावावरून जेव्हां परत संसारातील इतर दृश्य विषयांवर वळते तोपर्यंतच्या मधल्या काळात मनांतही एक प्रकारची प्रसन्नता जाणवतेच.

🚩 स्तोत्र म्हणजे एक काव्यकृतिच. पण अशा स्तुतिपर स्तोत्रांचीही ज्या कोणी रचना केली, त्या कर्त्यांचे वाग्चातुर्य, विद्वत्ता इ. ऐवजी त्यांची भक्ति, ज्ञान व त्यांची साधना हेंच प्रकर्षाने जाणवते. म्हणूनच कांही स्तोत्रे तर अक्षरशाः मंत्रांची जागा घे‍ऊन कामना सिद्धिसहित परमेश्वराची अनन्यभक्ति व ज्ञानप्राप्तीचे सामर्थ्यही संपादन करण्याची क्षमता असलेली आहेत. 

🚩 प्रस्तुत विष्णुसहस्रनाम पैकींच होय.

🚩 ज्या काळीं हें स्तोत्र रचले, तेव्हां संस्कृत भाषेचे ज्ञान सामान्यांनाही होते. त्यामुळें अर्थबोध होणे फार कठीण नव्हते. पण इसवीसनाच्या आठव्या शतकांतही परमार्थ मार्गातील औपनिषदिक वाङ्मय व स्तोत्रांमधील गर्भित अर्थ समजणे बहुधा कठीण झाले असले पाहिजे. 

🚩 ह्यासाठींच श्रीमत् शंकराचार्यांना तत्त्वज्ञानप्रचुर अशा दहा उपनिषदांवर भाष्य ( टीका ) करणे आवश्यक वाटले. शंकराचार्य रचित स्तोत्रें पाहतां त्यांना देव आणि देवींपैकी देवींची आराधना करण्यात जास्त रुची असल्यासारखे दिसते. पण भक्तवत्सल परमेश्वराला सामान्यांची करुणा असल्यामुळें, त्यांच्यावर कृपा करण्याच्या हेतुने त्यानें आचार्यांना 'विष्णुसहस्रनाम' यावर भाष्य लिहीण्यास प्रेरीत केले. 
असे म्हणायचे कारण म्हणजे ह्या मागे एक दंतकथा आहे.

🚩 असे म्हणतात की, आचार्यांना एकदा 'ललितसहस्रनाम' यावर भाष्य लिहायची इच्छा झाली. त्यांनी आपल्या एका शिष्याला त्याची पोथी आणायला सांगितले. पण शिष्यानें जे आणले ते होते विष्णुसहस्रनाम. 
त्यांनी शिष्याला परत ललितासहस्रनामाची पोथी आणण्यास सांगितले. शिष्याने जा‍ऊन दुसरी पोथी आणली तर काय, ती देखील विष्णुसहस्रनामाचीच. 

🚩 आचार्य परत काही बोलणार एव्हढ्यात आचार्यांना एका अगम्य वाणीद्वारा विष्णुसहस्रनाम यावरच भाष्य करण्याचा आदेश झाला. अलीकडील संतवाङ्‌गमयांतून अशा प्रकारच्या आदेशाची बरीच उदाहरणे पाहायला मिळतातच, पण पौराणिक ग्रंथांतूनही कांही ठिकाणी अशा प्रकारचे आदेश झाल्याचे उल्लेख आहेत.

🚩 विष्णुसहस्रनाम स्तोत्रात एकूण १४२ श्लोक आहेत. पहिले १३ श्लोक राजा युधिष्ठिराने केलेले प्रश्न व पितामह भीष्मांनी त्याच्या उत्तरादाखल असे आहेत. पुढे १०७ श्लोकांत विष्णुची १००० नांवे आहेत. त्यापुढील २२ श्लोकांत व्यासकृत फलश्रुती सांगितलेली आहे.

🚩 आतां हें लक्षात घेणे आवश्यक आहे कीं, ह्या सहस्रनामावळीमध्ये आदित्य वगैरें सारखी बरीच परिचीत नांवे आढळतील. पण आदित्य नामक सूर्यादिही भगवानांची विभूति असल्याकारणाने त्यांत भेद नाही. तसेंच कांही नामांची पुनरुक्ति झाल्यासारखे वाटले तरी त्या त्या स्थानी वृत्तीभेदामुळे अर्थभेद होतो म्हणून तेथें पुनरुक्ति नाही. परत असे समजावे कीं जेथें जेथें पुल्लीङ्गी शब्द आहेत तेथे विष्णु, जिथे स्त्रीलिङ्गी शब्द आहेत तेथे देवी व जिथे नपुंसकलिङ्गी शब्द आहेत तेथे ब्रह्माचे विशेषत्वाने नामवर्णन आले असे समजावे. पण मुख्यत्वें हें पक्के ध्यानांत ठेवावे कीं उत्पत्ति, स्थिति व लय यांचा कारणरूप ब्रह्म अशा एकाच देवतेची ही सर्व नांवे आहेत.

🚩 पहिल्या १३ श्लोकांमध्ये युधिष्टीराचे प्रश्न व त्याला पितामह भीष्मांनी दिलेले उत्तर हे थोडक्यात सांगता येण्यासारखे नसल्यामुळे तो विषय एक स्वतंत्र लेख होऊ शकेल. तूर्त विष्णुसहस्रनाम पठण करणाऱ्यांसाठी परमेश्वराच्या नामाचा अर्थबोध होऊ शकल्यास श्रेयप्राप्तीसाठी पठण जास्त उपयुक्त होईल ह्या विचाराने आज पहिल्या श्लोकात येणाऱ्या नामांचा विचार केलाय.

         🚩 ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः ।
                भूतकृद्‍भूतभृद्‍भावो भूतात्मा भूतभावनः ॥ १ ॥

🚩⚜️🌹 १. विश्वं - विश्वस्य जगतः कारणत्वेन विश्वम् इति उच्यते ब्रह्म । आदौ तु विश्वमिति कार्यशब्देन कारणग्रहणम्, कार्यभूतविरिञ्च्यादिनामभिरपि उपपन्ना स्तुतिर्विष्णोरिति दर्शयितुम् । - विश्वाच्या ( जगताच्या ) उत्पत्तिचे कारण म्हणून 'ब्रह्म' यास विश्व म्हटले आहे. 

विश्णुसहस्रामधील पहिले नावच 'विश्व' आहे हे दाखवून स्मृतिकारांना चराचर दृष्य जगत् आणि अगोचर परमात्मरूप यांत मुळीच भेद नाही हेच सांगावयाचे नाही का ? [ मग आचार्य "जगत् मिथ्या" म्हणतात ते कसे काय ? तो एक वेगळा विषय आहे. ] 

तेव्हां विश्वातील प्रत्येक अणुरेणूत परमात्मा आहे, एव्हढेच नाही तर प्रत्येक अणुरेणू (मी तुम्ही पण आलो त्यात ) परमात्माच आहे, वा परमात्म्याचे अंग (हिस्सा) आहे. आणि हे ज्याने तत्त्वतः जाणले त्या पुरुषाचे वर्णन भगवंतांनी भ. गी. ६.३० मध्ये सांगितले [ यो मां पश्यति सर्वतः ... ]. 

'विश्व'चा दुसरा अर्थ लावला तो असा - विशतीति विश्वं ब्रह्म - संदर्भ ? ' तत् सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत् ' - तै. उ. २.६ आणि ' यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति ' - तै. उ. ३.१. सर्गकाळी त्याने जगताची उत्पत्ति केली व त्यात तो स्वताः प्रवेश करता झाला, आणि प्रलयकाळी सर्व प्राणीमात्र त्याच्यात प्रवेश करते होतात. ह्या दोन्ही गोष्टीमुळे 'विश्व' हे ब्रह्मच आहे. आचार्यांनी आपल्या भाष्यात आणखी अनेक अनेक संदर्भ दिले आहेत.

🚩⚜️🌹 २. विष्णुः - वेवेष्टि व्याप्नोतीति विष्णुः, विषव्याप्त्यभिधायिनो नुक्प्रत्ययान्तस्य रूपं विष्णुरिति । देशकालवस्तुपरिच्छेदशून्य इत्यर्थः - जे काही व्याप्त आहे त्याला 'विष्णु' म्हणतात. व्याप्ति अर्थवाचक नुक्प्रत्ययान्त विष धातूचे रूप 'विष्णु' असे बनते. [ विष् चे आणखी पाच अर्थ आहेत ]. तात्पर्य 'तो', देश-काळ-वस्तुरूप त्रिविध अपरिच्छिन्न आहे. पुष्टीप्रित्यर्थ महानारायण उप् १३.१.५, आत्मबोध उप्. १ आणि विष्णुपुराण ३.१.४५ हे दाखले दिले आहेत. शिवाय महा. शान्तिपर्व ३४१ मधील ४२,४३ ह्या दोन श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला 'मला विष्णु का म्हणतात' हे स्पष्ट सांगितले आहे.

🚩⚜️🌹 ३. वषट्कारः - यत् उद्देशेन अध्वरे वषट् क्रियते सः वषट्कारः - ज्याच्या कृपेसाठी मंत्रोच्चारपूर्वक अर्घ्य दिले जाते तो 'वषट्कार' होय.

🚩⚜️🌹 ४. भूतभव्यभवत्‍प्रभुः - भूतं च भव्यं च भवच्च भूतभव्यभवन्ति तेषां प्रभुः - भूत, भविष्य व वर्तमानरूपी तिन्ही काळांचा प्रभु (वा ईश्वर). ह्या देवाचे ऐश्वर्य सत्तामात्र असल्याने तो वास्तविक कालभेदातीत आहे.

🚩⚜️🌹 ५. भूतकृत् - रजोगुणं समाश्रित्य विरिञ्चिरूपेण भूतानि करोतीति तथा तमोगुणमास्थाय स रुद्रात्मना भूतानि कृन्तति कृणोति हिनस्तीति - भूतकृत -- रजोगुणाच्या आश्रयाने स्थावर-जंगमादि अखिल भूतमात्रांची, प्राणीमात्रांची, ब्रह्मदेवाच्या रूपाने उत्पति करतो. तसेच रुद्ररूपी तमोगुणाच्या आश्रयाने प्राणीमात्रांचा नाश करतो, म्हणून भूतकृत्. इथें आश्रय करून याचा अर्थ त्याच्या ठायी असलेल्या अनंत शक्तिंपैकी माया शक्तीचा उपयोग करून. ब्रह्मदेवाच्या रूपाने म्हणजे 'ब्रह्मदेव' नावाने अवतरीत होऊन. आपण प्रत्येकजण जसे 'त्याचे' अवतार आहोत (पण हाय, स्वरूपविस्मृतिच्या आवरणामुळे अज्ञ आहोत ), तसाच ब्रह्मदेवही एक मनुष्येतर योनीतील अवतार.

🚩⚜️🌹 ६. भूतभृत् - सत्त्वगुणाच्या आश्रयाने भरण पोषण करतो तो भूतभृत् .

🚩⚜️🌹 ७. भावः - प्रपञ्चरूपेण भवतीति केवलं भवति इत्येव वा भावः - प्रपंचात उपाधीमुळे 'I am' असे अस्तिरूपाने भासणे हा भाव. 'भाव' ही एक सत्तामात्र स्वतंत्र 'वस्तु' आहे. मन ह्या इन्द्रियाने जाणणारे 'षडभाव' (लज्जा, गर्व, क्षुधा, तृषा, मोद, क्षोभ) ते वेगळे. तो अर्थ इथे अभिप्रेत नाही.

🚩⚜️🌹 ८. भूतात्मा - भूतानां अन्तर्यामि इति भूतात्मा. पुष्टी - बृ. उ. ३.७.३.२२ - 'एष ते आत्मान्तर्याम्यमृतः' - सर्व चेतन प्राणीमात्रांच्या अंतस्थ स्थित परमात्म्याचे भूतात्मा हे ८ वे नाम.

🚩⚜️🌹 ९. भूतभावनः - भूतानि भावयति जनयति वर्धयति इति भूतभावनः - भूतमात्रांची उत्पत्ति, वृद्धि करतो तो भूतभावनः

नमो नमः - ॐ तत्सत् -

साभार.....🙏

श्लोक २

श्लोक ३

श्लोक ४

श्लोक ५

श्लोक ६

श्लोक ७

श्लोक ८

श्लोक ९

श्लोक १०

श्लोक ११

श्लोक १२

श्लोक १३

श्लोक १४

श्लोक १५

श्लोक १६

श्लोक १७

श्लोक १८

श्लोक १९

श्लोक २०

श्लोक २१

श्लोक २२

श्लोक २३

श्लोक २४

श्लोक २५

श्लोक २६

श्लोक २७

श्लोक २८

श्लोक २९

श्लोक ३०

श्लोक ३१

श्लोक ३२

श्लोक ३३

श्लोक ३४

श्लोक ३५

श्लोक ३६

श्लोक ३७

श्लोक ३८

श्लोक ३९

श्लोक ४०

श्लोक ४१

श्लोक ४२

श्लोक ४३

श्लोक ४४

श्लोक ४५

श्लोक ४६

श्लोक ४७

श्लोक ४८

श्लोक ४९

श्लोक ५०