श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १६
April 28, 2021
🚩⚜️🌹 श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १६ 🌹⚜️🚩
#श्री_विष्णु_सहस्रनाम_श्लोक_भावार्थ
भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः ।
अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः ।।
🚩⚜️🌹 (१४१) भ्राजिष्णुः : - जे स्वयंप्रकाशी ज्ञानतत्व सर्व जगत् प्रकाशित करते ते. ते ज्ञानतत्व हा प्रकाश दुसर्या कशापासूनही घेत नाही. 'हा प्रकाशाचाही प्रकाश असून तो अंधःकारासही प्रकाशित करतो. (गीता १३-१८), [१]उपनिषदांनीही ठामपणे उद्धृत केले आहे की ' तेथे सूर्याचा प्रकाश नाही, तारकाचंद्राचा प्रकाश नाही तसेच विद्युलतेलाही नाही तर ह्या अग्निला कोठून असणार ? 'त्याचे प्रकाशामुळे या सर्वांना प्रकाश मिळतो व ते प्रकाशित झाले असतां या सर्वांचे ज्ञान होते.
🚩⚜️🌹 (१४२) भोजनम् : - या संज्ञेचा प्रथम अर्थ होतो अन्न - खाद्यपदार्थ. परंतु तत्वज्ञानांत या शब्दाला व्यापक अर्थ आहे. 'भोजन ' या शब्दांत सर्व इंद्रियांना प्रतीत होणारे त्यांचे उपभोग्य अनुभव जगत् समाविष्ट होते. इंद्रियांना प्रतीत होणारे सर्व विषय, अंतर्गत मानसिक क्रिया - प्रतिक्रिया, जड जगतातील विचित्रपूर्ण सर्व विषय या सर्वांच्या समुच्चयानें जी संकल्पना तयार होते तिला 'माया' असे संबोधण्यात येते. मायेच्या कार्यावरून व तिच्या स्वरूपा-वरून टीकाकारांनी तिलाच 'भोजन' अशी संज्ञा देउन टाकली. तैत्तिरीय उपनिषद म्हणते, ' ते खरोखर रसमयतत्व आहे.' (रसो वै सः । २-७)
🚩⚜️🌹 (१४३) भोक्ता - उपभोग घेणारा : - हे उपभोग्य अनुभव जगतच केवळ विष्णुस्वरूप आहे असे नाही तर उपभोग घेणारी इंद्रिये व विषयातून मिळणारे सुखदुःख हेही सर्व लक्ष्मीपती विष्णुच्याच अस्तित्वाने प्रतीतीस येते. शुद्धज्ञान स्वरूप चैतन्य स्थूल, सूक्ष्म व कारण देहामधून अभिव्यक्त होते, व जागृत स्वप्नद्रष्टा किवा सुषुप्त अशा अवस्था धारण करते व या जीवनातील सर्व बर्यावाईट घटनांचा जीव रूपाने अनुभव घेते. चैतन्य अगर [२] पुरूष प्रकृतीशी तादात्म्य पावून तिच्या गुणांबरोबर अगर अनेक कार्यां बरोबर एकरूप होतो व त्यातून उत्पन्न होणार्या अनेक विकारांचा व अवस्थांचा अनुभव घेतो. शुद्ध स्वरूपांत आत्मा हा कार्यरहित आहे परंतु मायेच्या सानिध्यात तोच कार्यकारी असल्याचे भासते व त्यामुळेच कर्मातून उत्पन्न होणारे 'सुखदुःखरूपी' फल भोगणारा भोक्ता तो होतो.
🚩⚜️🌹 (१४४) सहिष्णु : - बाह्य घटना व त्यांचे परिणाम जो अत्यंत शांतपणे व अलिप्ततेने सहन करू शकतो त्यास 'सहिष्णु' म्हटले जाते. पृथ्वीवर पडणार्या सूर्याच्या प्रतिबिंबामध्ये कितीही फेरबदल झाले तरी अंतराळातील सूर्यावर त्याचा कांहीही परीणाम होत नाही. त्या प्रतिबिंबाच्या संदर्भाने सूर्य 'सहिष्णू' आहे व आपल्या असंख्य प्रतिबिंबाचा केवळ साक्षी आहे.
सहिष्णू या संज्ञेचे संस्कृतमध्ये इतर दोन अर्थ आहेत.
(१) क्षमा करणारा
(२) जेता.
आपल्यामधील अनेक दुष्कृतींना श्रीविष्णु क्षमा करतो व आपल्या अनेक प्रतिकूल दुष्प्रवृत्ती जिंकतो.
🚩⚜️🌹(१४५) जगदादिजः : - जो विश्वाच्या (जगत्) उत्पत्तीच्या पूर्वी (आदि) जन्मला (जः) तो जगदादिजः श्रीविष्णु. [३] प्रलयाचे वेळी जेव्हा सर्व स्थूल व सूक्ष्म शरीरे महाकारण देहामध्ये लीन होऊन रहातात. तेंव्हा ते जगत् ईश्वरामध्ये लीन झाले असे म्हणतात. पुन्हा उत्पत्तीचे वेळी स्थूल जगत् निर्माण होते. त्यापूर्वी त्याची सूक्ष्म विचारात्मक (स्पंदनात्मक) अवस्था असते. त्या विचारांनी मन बुद्धीची घडण होते. ज्यावेळी परमात्मा ह्या समष्टी मनातून व्यक्त [४] होतो त्यावेळी त्याला ' हिरण्यगर्भ ' असे संबोधिले जाते. तेच सर्व पदार्थांचे उत्पत्ति स्थान आहे. या हिरण्यगर्भावस्थेतून सर्व स्थूल सृष्टि व्यक्त दशेला येते व परमात्मा विराट आत्मा ह्या स्वरूपांत तेथे कार्य करतो. महाविष्णु जो विश्वातील सर्व स्थूल देह जन्माला येण्याचेही आधी जन्मला त्याचेपासूनच सर्व जगत् उत्पन्न झाले म्हणून 'हिरण्यगर्भ' या नांवाने उद्धृत केला जातो, व तोच जगताचा कर्ता आहे.
🚩⚜️🌹 (१४६) अनघः : - अघ म्हणजे पाप किंवा मल. अनध म्हणजे पाप नाही असा. किवा ज्याचे ठिकाणी अपूर्णतेचा कलंक नाही असा. तसेच सकाम कर्मातून निर्माण होणार्या सुखकारक अगर दुःखकारक वासनांमध्ये तो कधीही लिप्त होत नाही म्हणून तो अनघ आहे. आत्म्याचा ज्ञानप्रकाश मनाला प्रकाशित करतो परंतु मनातील सद्गुणांची शांती अगर पाप वासनेची खळबळ आत्मप्रकाशावर प्रभाव पाडूं शकत नाही. कारण प्रकाशक हा नेहमीच प्रकाश्याहून भिन्न असतो. म्हणूनच छांदोग्य उपनिषद् म्हणते, ' तो पापरहित आहे.' (८-१५)
🚩⚜️🌹 (१४७) विजयः : - जय मिळविणारा. जो आत्म्याचे सत्यज्ञान जाणतो व त्यानंतर प्रकृतीच्या बंधनातून मुक्त राहू शकतो, शरीराच्या सुख दुःखात्मक यातनांवर विजय मिळवूं शकतो. तसेच मनाच्या भावना, कल्पनांचे पलिकडे जाऊ शकतो, तो विजय स्वरूप श्रीविष्णु होय. अर्थात् प्रकृतीवरील विजयाचे स्थान म्हणजे आत्म्याचे स्थान. आत्म्याची शांती व सुसंवादित्व जगातील विविध द्वंद्वाच्या गलबल्याने कधीच नष्ट होत नाही.
अर्जुनाचे एक नांव विजय होते व श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात 'पांडवांमध्ये मी अर्जुन आहे. (१०-३०)
🚩⚜️🌹 (१४८) जेता : - नेहमी जिंकणारा. सर्व व्यवहारामध्ये नेहमी त्याचाच जय होत असतो. ज्याला कधीही अपयश माहिती नाही तो जेता श्रीविष्णु. उपनिषद् म्हणते सत्याचाच नेहमी जय होतो. असत्याचा कधीही नाही. (सत्यमेव जयते नानृतम्).
🚩⚜️🌹 (१४९) विश्वयोनिः : - ह्या संज्ञेचे दोन तर्हेने अर्थ केले जातात.
(१) जो सर्व विश्वाचे उत्पत्ती स्थान (कारण) आहे तो किवा
(२) सर्व विश्व हे ज्याला कारण स्वरूप होते तो.
ज्यांना आता पर्यंतच्या विवेचनावरून पहिला अर्थ अत्यंत सुलभ व स्पष्ट झाला आहे, त्यांना दुसरा अर्थ मात्र खचितच गोंधळात टाकाणारा वाटेल. परंतु पुराणांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास दुसरा अर्थही तर्कसंगत आहे. परमात्म्यानें या विश्वामध्ये जगातील विशिष्ट परिस्थितीकरताच वेळोवेळी अवतार घेऊन स्वतःला प्रकट केले आहे म्हणजेच त्याच्या प्रकटीकरणाचे विश्व हे कारणच झाले आहे.
🚩⚜️🌹 (१५०) पुनर्वसु: - (वसति इति वसुः) : - जो पुनःपुन्हा शरीरातील वेगवेगळया उपकरणांमध्ये वसती करतो, स्थित होतो तो पुनर्वसु.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
[१] न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमाः विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः ।
तमेव भान्तमनुभाति सर्व तस्य भासा सर्वभिदं विभाति ।।
[२] पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङक्ते प्रकृतिजान् गुणान् ।
[३] समष्टि कारण शरीराभिमानी आत्मा ईश्वरः ।
[४] समष्टि सूक्ष्मशरीराभिमानी आत्मा हिरण्यगर्भः ।
क्रमशः.....
साभार.....🙏