प्रसिद्ध श्री शारंगधर बालाजी मेहकर प्रकट दिन उत्सव | दिवस तिसरा | आजचा पोशाख - महादेवाचा

shri sharangdhar balaji poshakh photos

आजचा पोशाख - महादेव
श्री शारंगधर बालाजीं बद्दल थोडक्यात

मेहकर शहराचे जुने नाव मेघंकर. कालांतराने  पुढे हे नाव मेहकर झाले. शके १८८८ ला खोदकामात सापडलेली रेखीव मूर्ती शहराची ग्रामदेवतां झाली. श्री शारंगधर बालाजी नावाने ओळखली जाणारी हि मूर्ती बघितल्यानंतर डोळ्याचे पारणे फिटतात, आणि आपोआपच मनुष्य नतमस्तक होतो त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक दरवर्षी या ठिकाणी भेट देत असतात.
शहरात असलेले श्री शारंगधर बालाजीचे मंदिर मेहकर शहराचे प्रमुख आकर्षण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील मनुष्य शारंगधराचे नाव ऐकून आहे मेहकरचा व्यक्ती नोकरी , व्यवसायानिमित्त मेहकर सोडून जिथे जिथे गेला आहे, त्या परिसरात त्याने 'शारंगधराची' प्रसिद्धी केली आहे त्यामुळे दररोज मंदिरात येणारे बाहेर गावचे भाविक शारंगधराला बाघितल्यावर स्वतःला धन्य मानतात. साक्षात श्री विष्णूचेच दर्शन झाल्याचा त्यांना आनंद होतो. मूर्तीचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. ११ फूट उंच असणारी हि मूर्ती एक अखंड काळ्या पाषाणावर रेखाटलेली आहे मूर्ती इतकी रेखीव आहे की प्रत्येक पैलू हा ठळक दिसतो. ज्याने कोणी हे रेखीव काम केले असेल त्याचा अद्याप शोध लागला नाही. मूर्ती प्रतिष्ठापनेस आज ३ सप्टेंबर २०१८ रोजी  १३४ वर्षे झाली तरी मूर्तीचे तेज कायम आहे आणि दर्शनाला गेल्यावर शारंगधर आपल्याकडे बघून छान स्मितहास्य करत असल्याचा भास होतो.
दरवर्षीचा प्रकट दिन उत्सव व दहा दिवस चालणार उत्सव मेहकरवासियांकरिता आनंदाची पर्वणी असते. श्रावण महिन्यात महिनाभर शेकडो भाविक मंदिरात बसून विष्णुसहस्त्रनामाचे पठण करतात. दर शुक्रवारी प्रसाद म्हणून मिळणाऱ्या खिचडीचा लाभ भाविक घेतात. मंदिराला भक्तांकडून मिळणारी देणगी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.
विदर्भाची पांढरी संत गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम सुद्धा दरवर्षी मंदिरातच असतो. मेहकर मध्ये कोणी नवीन पाहूणा आला आणि त्याने शारंगधराचे दर्शन  नाही घेतले असे क्वचितच होते.
थोडक्यात सांगायचे झाले तर मेहकरवासियांच्या हृदयाच्या गाभाऱ्यात हि देवता विराजते.