श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४९
April 28, 2021
🚩⚜️🌹 श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४९ 🌹⚜️🚩
#श्री_विष्णु_सहस्रनाम_श्लोक_भावार्थ
सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् ।
मनोहरो जितक्रोधो वीरबाहू र्विदारणः ।।
🚩⚜️🌹 (४५५) सुव्रतः : - ज्याचे व्रत अत्यंत शुभ आहे असा. भगवान् रामचंद्र म्हणतात, 'ज्याने अनन्यतेने शरणता स्विकारली आहे त्याचे संपूर्ण संरक्षण करणे व आधार देणे ही माझी प्रतिज्ञा “शुभव्रत” आहे. (अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येत् व्रतं मम) सर्व प्राणीमात्रांना आधार देणे हे माझे व्रत आहे.’ असे भगवंत म्हणतात. बद्रिनाथाचे ठिकाणी नरनारायण शिखरावर जो अनेक वर्षपर्यंत तपश्चर्या करतो तो सुव्रत असाही या संज्ञेचा संदर्भ दाखविता येईल..
🚩⚜️🌹 (४५६) सुमुखः : - ज्याचे मुख अत्यंत सुंदर, शोभायमान आहे असा. सत्य हेच सौंदर्य आहे व सौंदर्य हेच सत्य आहे. सर्व परिस्थितीमध्ये तो भगवंत अत्यंत आनंदपूर्ण असतो त्यामुळे त्याचे मुखावर सदैव शांतिपूर्ण मंगल सौंदर्य विलसत असते. ज्यावेळी भक्त भगवंताचे पायाशी शरणागत होतात तेंव्हा भगवंताची अनंत दया त्याचे सौंदर्यपूर्ण मुखावरून भक्तास प्रतीत होते म्हणून तो सुमुख आहे.
🚩⚜️🌹 (४५७) सूक्ष्मः : - अत्यंत सूक्ष्माहूनही सूक्ष्म असा. वेदांतमताप्रमाणे सूक्ष्मता व्यापकता दर्शविते. या संज्ञेने त्याची व्यापकता निर्देशित होते. तो परमात्मा सूक्ष्माहून सूक्ष्म सर्वगत आहे, असे उपनिषद् सांगते – सर्वगतं सुसूक्ष्मम् । .
🚩⚜️🌹 (४५८) सुघोषः : - ज्याचा घोष अत्यंत शुभ (मंगल) आहे असा. महाभारतातील युद्धाचेवेळी भगवंतांनी जो शंख फुंकला त्याचेही हेच नांव आहे. श्रीविष्णूचा हा घोष म्हणजेच वेदतत्त्व होय. कारण चाहही वेद त्या परमात्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. म्हणूनच त्याला सुघोष अशी संज्ञा दिली आहे.
🚩⚜️🌹 (४५९) सुखदः : - सुख देणारा. किवा संस्कृत व्युप्तत्तिप्रमाणे सुखाचा नाश करणारा असाही अर्थ होतो. (द - नाश करणे) अर्थातच् या ठिकाणी सुखद म्हणजे भक्तांना सुख देणारा व दुर्जनांचे सुख नाहीसे करणारा.
🚩⚜️🌹 (४६०) सुहृत् : - सर्व प्राणीमात्रांचा स्नेही. जो खरा मित्र असतो तो. पुन्हा परतफेडीची अपेक्षा न करतां आपल्याजवळचे सर्व काही देतो. असा सुहृत् भगवान् 'श्रीविष्णु' आहे.
🚩⚜️🌹 (४६१) मनोहर : - जो मनाचे हरण करतो असा. किवा सौंदर्यवान. तो भगवंत केवळ साकार सौंदर्याची मूर्तीच आहे इतकेच नव्हे तर तो बलात्, भक्ताच्या मनाला, इंद्रियांना आपल्या विषयापासून खेचून घेतो व त्याच्या मनोहारी सौंदर्यावर स्थिर करतो. अशा प्रकारे भक्तांच्या मनांत दुर्दम्य (अमर्याद) आनंद निर्माण करून त्यांना आपला सर्वकाल भगवंताच्याच पूजनांत घालविण्यास भाग पाडणारा असा तो श्रीविष्णु मनोहर आहे.
🚩⚜️🌹 (४६२) जितक्रोधः : - ज्याने क्रोध जिंकला आहे असा. क्रोध या शद्बाने इतर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सहाही विकार निर्देशित केले आहेत. हे सहा विकार माणसांच्या विचार सरणींचे सहा वर्ग निर्देशित करतात व त्यानुसार त्याच्या मानसिक घडणीचे सहा प्रकार संभवतात. ज्याने सहा विकार जिंकले आहेत तो मनातीत आत्मा आहे.
🚩⚜️🌹 (४६३) वीरबाहुः : - ज्याचे बाहु सामर्थ्यवान व पराक्रमी आहेत असा. वेळोवेळी दुर्जनांचा नाश करून सज्जनांचे रक्षण करण्याकरतां अवतार घेणारा तो श्रीविष्णु 'वीरबाहु' आहे.
🚩⚜️🌹 (४६४) विदारणः : - जो नाश करतो, विदारण करतो तो. नर-सिंह या अवतारामध्ये श्रीविष्णूंनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडले व त्याला मारले. तसेच हिरण्याक्षाचा नाश करून पृथ्वीचा सागरातून उद्धार करण्याकरतां त्यांनी महावराहाचे रूप घेतले. संस्कृत शब्दार्थाप्रमाणे भू-दार म्हणजे वराह. दार म्हणजे फाडणे, तुकडे करणे- जो फाडतो तो 'दिव्य वराह' असाही या विदारण संज्ञेचा अर्थ घेता येईल.
क्रमशः.....
साभार.....🙏